अलिबाबाचे संस्थापक जॅक मा नेहमीच आपल्या धोरणांमुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी लोकांना 996 फॉर्म्यूला सांगत त्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला होता. 996 चा अर्थ आठवडाभर सकाळी ९ वाजण्यापासून त रात्री ९ वाजेपर्यंत सलग काम करणे. मात्र आता जॅक मा यांनी सेक्ससंबंधी सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 669 चं सूत्र सांगितलं आहे. याचा अर्थ सहा दिवस, सहा वेळा सेक्स करणे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारे जॅक मा यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान हे सूत्र सांगितलं. जॅक मा यांनी सांगितलं की, ‘काम करताना मी 996 वर जोर देतो आणि खासगी आयुष्यात 669 ची अंमलबजावणी केली पाहिजे’.

५४ वर्षीय जॅक मा दरवर्षी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन करतात. १० मे रोजी हा कार्यक्रम पार पडतो. तंत्रज्ञान क्षेत्रात जॅक मा यांच्या 996 फॉर्म्युलावर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यातच आता त्यांच्या 669 फॉर्म्युलावरुनही सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला आहे.

एका युजरने खिल्ली उडवत म्हटलं आहे की, ‘जगात कोणाकडे 669 केल्यानंतर 996 साठी एनर्जी उरणार आहे’. अलिबाबाच्या अधिकृत पेज वाइबोवर 669 सुत्र एका इमोजीसोबत पोस्ट करण्यात आलं आहे.