परग्रहवासी म्हणजे एलियन्सने अमेरिकेसोबत करार केला आहे. पृथ्वीवर एलियन्सकडून केल्या जाणाऱ्या प्रयोगांबद्दल अमेरिकेला कल्पना असून या करारामुळे ते शांत आहेत. या एलियन्सचा मंगळावर एक गुप्त केंद्र आहे. मात्र जोपर्यंत मानव या एलियन्सला स्वीकारण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत यासंदर्भात खुलासा केला जाणार नाही, असा दावा इस्रायलच्या अंतराळ कार्यक्रमाच्या माजी प्रमुखांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. “आपला पृथ्वीवर वावर आहे यासंदर्भातील घोषणा करु नये असं एलियन्सने म्हटलं आहे. एलियन्सला स्वीकारण्यासाठी मानव अजून मानसिक दृष्ट्या तयार झालेला नसल्याने त्यांनी आपला वावर गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असं हाइम अशद यांनी इस्रायलमधील येडीओथ अहरोनोथ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नक्की  वाचा >> एलियन्स आहेत का? “होय! कदाचित पृथ्वीवरच आहेत; फक्त…”

मात्र अशद यांनी केलेल्या दाव्यावरुन इस्रायलमधील प्रसारमाध्यमांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशद यांचे वय ८७ असून त्यांनी केलेले काही दावे हे अतिशयोक्ती वाटत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये मोठा गोंधळ दिसून येत असून यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दोन्ही देशांमधील राजकीय मुसद्देगिरीचा संदर्भही दिसून येत असल्याचं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

अशद यांनी गॅलेक्टीक फेड्रेशन म्हणजेच आकाशगंगेतील एलियन्सच्या संस्थेचाही उल्लेख केला आहे. “ट्रम्प हे एलियन्सच्या अस्तित्वासंदर्भात खुलासा करणारच होते. मात्र गॅलेक्टीक फेड्रेशनने त्यांना थांबवले. लोकांना जरा शांत होऊ द्या असं फेड्रेशनने म्हटलं,” असा दावा अशद यांनी मुलाखतीमध्ये केला आहे. एलियन्सला गोंधळ निर्माण करण्याची इच्छा नसून अधी मानवाला आपल्या अस्तित्वासंदर्भात मान्यता देण्याबद्दलची शक्यता निर्माण होऊ दे ही गोष्ट समजून घेऊ दे अशी त्यांची भूमिका असल्याचं अशद म्हणाले आहेत. अशद हे इस्रायलच्या अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख होते. १९८१ ते २०१० म्हणजे जवळजवळ तीस वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.

नक्की वाचा >> खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, “आपल्याच आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता”

एलियन्सने आपलं अस्तित्व लपवून ठेवण्यासंदर्भातील करार केला आहे. “मानवाने प्रगती करुन आपली बौद्धिक क्षमता वाढवावी. अंतराळ आणि अंतराळयानासंदर्भातील अधिक ज्ञान मानवाला मिळेपर्यंत एलियन्सने वाट पाहण्याचा निर्णय घेतलाय,” असंही अशद म्हणाले. अमेरिका आणि एलियन्समध्ये करार झाला आहे. त्यांनी आमच्यासोबतही (इस्रायलसोबत) करार केला असून आमच्या इथे काही प्रयोग करण्यासंदर्भातील हा करार आहे. एलियन्सही विश्वाचं कोडं उलगडण्यासाठी संशोधक करत आहेत. आपण त्यांना मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे, असंही अशद यांनी नमूद केलं आहे.

या एलियन्सचा एक तळ मंगळ ग्रहावर आहे. अशद यांनी अमेरिकन अंतराळवीर आधीच मंगळावर पोहचल्याचा दावाही केला आहे. “मंगळाच्या पृष्ठभागाखाली एलियन्सचा तळ आहे. तिथे त्यांच्या प्रतिनिधी आणि अमेरिकेचे अंतराळवीरही आहेत,” असं अशद मुलाखतीमध्ये म्हणालेत.

मुलाखतीदरम्यान आपण सांगत असणाऱ्या गोष्टी तुम्हाला एखाद्या विज्ञान कथेनमधील कल्पनिक गोष्टी वाटत असल्या तरी हळूहळू यासंदर्भातील खुलासा करणारी लोकं समोर येतील असा विश्वास अशद यांनी व्यक्त केला आहे. “आज मी जे बोलत आहे ते पाच वर्षांपूर्वी बोललो असतो तर कदाचित मला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं असतं. मात्र मी यासंदर्भात अभ्यास केला आहे. त्यांनी मानवाने विचारशक्ती सोडली आहे असं म्हटलं होतं. आज त्यांनी वेगळ्या माध्यमातून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. माझं यामध्ये काहीच नुकसान नाहीय. मला अनेक पदवी आणि पुरस्कार मिळालेत. अनेक परदेशी विद्यापिठांमध्ये मला सन्मान मिळतो जिथे आता यासंदर्भात विचार होऊ लागला आहे,” असं मत अशद यांनी व्यक्त केलं आहे.