20 October 2020

News Flash

अलीगढमधील हत्याप्रकरणावर शिवसेना म्हणते, ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात

अलीगढमधील घटनेने मानवतेस कलंक लागला व समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. जे सत्ताधारी म्हणून निवडून आले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे गरजेचे आहे.

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे तीन वर्षांच्या मुलीच्या हत्या प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. काँगेस राजवटीत ‘निर्भया कांड’ घडले तेव्हा ज्यांनी संसद चालू दिली नाही व महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. त्यामुळे आजच्या सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी मोठी आहे, अशी आठवण शिवसेनेने उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला करुन दिली आहे.

अलीगढमधील टप्पल परिसरात राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. १० हजार रुपयांच्या वादातून त्या चिमुरडीची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला होता. या घटनेवर सोमवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारला फटकारले आहे.

अलीगढमधील घटनेने मानवतेस कलंक लागला व समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. जे सत्ताधारी म्हणून निवडून आले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे गरजेचे आहे. मोदी व शाहा अशा लोकांना वारंवार समज देत असतात तरीही ही मंडळी भरकटलेली का असतात? बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास जेलमध्ये जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा सुरू आहे. पोलीस महासंचालकांच्या घराच्या बाहेरून अपहरण होते व पोलीस अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन येतो, या घटनांचा दाखला देत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

दहशतवादी व गुन्हेगारांना सरळ गोळ्या घालता येतात, पण विकृत माथेफिरू आपल्याच अवतीभोवती लपलेले असतात व ते संधी साधून गुन्हे करतात. अलीगढमधील प्रकरणातही पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. पोलिसांमधील बेफिकिरी व शिथिलतासुद्धा असे गुन्हे करणाऱ्यांना बळ देत असते. अलीगढच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 10:16 am

Web Title: aligarh child murder case shiv sena slams bjp yogi government
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
2 Kathua gang rape and murder case: आज आरोपींचा फैसला
3 दिल्लीचे संरक्षण करणार अमेरिकेचे क्षेपणास्त्र; भारत खरेदी करणार NASAMS-II
Just Now!
X