अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मौलाना आझाद वाचनालयात पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जात नसल्याच्या कारणावरून सध्या मोठे वादळ उठले आहे. विद्यापीठातील मुलांसाठीच्या वाचनालयात पदवीच्या विद्यार्थिनी आल्यास ‘समस्या’ उद्भवू शकते; याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल निर्माण होऊ शकते, असा ‘शोध’ विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंनीच लावल्याने चोहोबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान, विद्यापीठाने आरोप फेटाळून लावताना वाचनालयात विद्यार्थिनींची आसनव्यवस्था आणि सुरक्षित वाहतुकीची सोय न झाल्याने त्यांना प्रवेश नाकारल्याचे म्हटले आहे.
विद्यापीठाचे प्रकुलगुरू जमीर उद्दीनशाह शाह यांनी आरोपांचे स्पष्ट खंडन केले. ते म्हणाले, अलिगढ विद्यापीठाला लागूनच असलेल्या महिलांच्या महाविद्यालयातच मुली शिकतात आणि १९६० पासूनच मौलाना आझाद ग्रंथालयात मुलींना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मुलींना ग्रंथालयाचा वापर करता येणार नाही, असा कोणताही ताजा आदेश विद्यापीठाकडून देण्यात आलेला नाही.
पदव्युत्तर विद्यार्थिनी आणि महिला या ग्रंथालयातील पुस्तकांचा संदर्भासाठीचा वापर किंवा जागेचा वापर आंरभापासूनच नेहमी करीत आहेत. त्यामुळे लिंगभावविषयक भेदभाव केला जात असल्याचा आरोप खोटा आहे आणि विद्यापीठाविरुद्ध असा आरोप करून काही जणांनी केवळ चूकच केलेली नाही तर हा आरोप खोडसाळपणाचा आणि शिक्षणसंस्थेची बदनामी करणार असल्याचे शाह म्हणाले.
 महिला महाविद्यालय विद्यापीठाच्या मुख्य आवारापासून दोन किलोमीटरहून अधिक लांब अंतरावर आहे आणि पदवीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात उच्च प्रतीच्या ग्रंथालयाचा वापर करण्यास मिळतो.