अलिगढ मुस्लीम विद्यापीठात (एएमयू) झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकाला कोणी चिथावणी दिली ते शोधून काढण्याचा निर्धार विद्यापीठाचे कुलगुरू जमीरउद्दीन शाह यांनी व्यक्त केला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पाठविलेल्या पत्रात शाह यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची सीबीआय अथवा विशेष कृती दलामार्फत चौकशी करावी. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे, असे मत व्यक्त करून शाह म्हणाले की, स्थिती पूर्वपदावर आणून हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. विद्यापीठाच्या संकुलात शनिवारी झालेल्या हिंसाचारात दोन विद्यार्थी ठार झाले त्यामुळे शीघ्र कृती दलास पाचारण करावे लागले होते. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतून हिंसाचारात बाह्य़शक्तींचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. एफआयआरमध्ये अनेकांची नावे आली असली तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले असता शाह म्हणाले की, आम्ही व्हिडीओ चित्रीकरणाचे पुरावे तपासत आहोत, येत्या एक-दोन दिवसांत त्याचे परिणाम दिसून येतील.