राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी दिल्लीजवळील तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही पोलिसांनी स्थानिक कोर्टासमोर सादर केले. दरम्यान, ‘या कृत्याचा आपल्याला कोणताही खेद नाही, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. आम्ही आमचा संविधानिक अधिकार वापरल्याचे’ तिने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता.

हा सगळा प्रकार इतका विकृतपणे करण्यात आला होता की, पूजा पांडेने गोळी मारताच गांधींच्या पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती.

अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला.
हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर करवाईची मागणी होत होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता.