राजस्थानमधील झुंडबळी : न्यायालयाचा निकाल

जयपूर : देशभर गाजलेल्या राजस्थानातील पेहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. संशयाचा फायदा देत आरोपींना निर्दोष ठरवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

पेहलू खान, त्यांची दोन मुले आणि काही जण १ एप्रिल २०१७ रोजी जयपूरमधून गायी घेऊन हरयाणातील आपल्या गावी निघाले होते. अलवरमध्ये गोतस्करी करत असल्याच्या संशयातून या सर्वाना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती. त्यात पेहलू खान यांचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या झुंडबळीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

या प्रकरणाची सुनावणी ७ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्ण करून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सरिता स्वामी यांनी निकाल बुधवापर्यंत राखून ठेवला होता. पेहलू खान यांच्या दोन मुलांसह ४० जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता.

न्यायालयाने या प्रकरणातील सहाही आरोपींना बुधवारी निर्दोष ठरवले. विपीन यादव, रवींद्र कुमार, काळूराम, दयानंद, योगेश कुमार आणि भीम राठी या सहा आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष ठरवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे सरकारी वकील योगेंद्र खताना यांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. या तिघांविरोधात बालन्यायालयात खटला सुरू आहे. पेहलू खान झुंडबळी प्रकरणामुळे राजस्थानमधील तत्कालीन भाजप सरकारवर टीकेची झोड उठली होती. अलीकडे राजस्थान सरकारने झुंडबळी रोखण्यासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले आहे.