चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे देशावर आणीबाणी लादत असल्याचा टीका करत सर्व भाजपा विरोधक नेत्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी तुरूंगात पाठवले जाणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. लालूप्रसाद यादव हे बुधवारी मुंबईहून उपचार करून रांचीला परतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हत्या होईल या भीतीने मोदी हे घाबरले आहेत. पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला हे शोभत नाही. मोदींना धोका असल्यामुळे काही डाव्या विचारवंतांना अटक करण्यात आली आहे. हा लोकांच्या अधिकारावर हल्ला आहे, असे ते म्हणाले. विरोधकांच्या एकतेवर भाष्य करताना ते म्हणाले, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या मुद्यावरून कोणताही वाद नाही. आम्ही योग्यवेळी पंतप्रधान निवडू. तत्पूर्वी त्यांनी पाटणा येथे मोदी सरकार आणीबाणी लागू करण्याची तयारी करत असल्याचा आरोप केला होता.

झारखंड उच्च न्यायालयाने २४ ऑगस्टला लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. तत्पूर्वी चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव देण्यात आलेल्या जामिनाची मुदत वाढवण्यास न्यायालयाने नकार दिला होता. गरज भासल्यास लालूंवर रिम्स रूग्णालयात उपचार करण्यात येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.