इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या ४० भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सांगितले. इराकमधील मोसूल शहरात एका बांधकाम कंपनीत कामास असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाले असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या भारतीयांशी सरकारचा कोणताही संपर्क होत नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अपह्रत झालेले सर्व भारतीय पंजाबमधील आहेत.
इराकमध्ये सुन्नी कट्टरवाद्यांकडून देशाच्या उत्तरेकडील शहरे ताब्यात घेण्यात येत आहेत. मोसूल शहरावर कट्टरवाद्यांनी ताबा मिळवल्यानंतर भारतीयांचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले. अपहरण केलेल्यांनी अद्याप केंद्र सरकारशी कोणताही संपर्क साधला नसून, कोणतीही मागणी केलेली नाही. त्याचबरोबर नक्की कोणत्या संघटनेने भारतीयांचे अपहरण केले, हे सुद्ध स्पष्ट झालेले नाही. सर्व भारतीय बगदादस्थित तारिक नूर अल हुदा कंपनीच्या मोसूल शहरातील प्रकल्पावर काम करीत होते.
दरम्यान, अपह्रत भारतीयांचे कुटुंबीय गुरुवारी सुषमा स्वराज यांची भेट घेण्याची शक्यता आहे.