पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतली आणि सोनोवाल यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

पुरामुळे झालेले अतोनात नुकसान, त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण, नागरिकांना राज्य सरकार करीत असलेली मदत, पुनर्वसन या बाबतची माहिती सोनोवाल यांनी मोदी यांना दिली.

राज्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी पूरग्रस्तांना मदतकार्यामध्ये सहभागी व्हावे, असे त्यांना सांगण्यात आल्याचे सोनोवाल म्हणाले. अहोरात्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना रात्रंदिवस काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आसामला या स्थितीत केंद्राकडून लागणारी सर्वतोपरी मदत देण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर मदत आणि पुनर्वसन सुरू करावे, अशा सूचना मोदी यांनी सोनोवाल यांना दिल्या आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यातील पूरस्थितीची माहिती दिली. पूरग्रस्त जनतेला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आदेश शहा यांनी एनडीआरएफला दिले आहेत.