सीबीएसई पेपरफुटी प्रकरण

सीबीएसईच्या दहावीच्या गणिताचा तसेच, बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शाकरपूर येथील पालक रिपक कन्सल यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यातील निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत असे असताना फेरपरीक्षा देणे सयुक्तिक नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. पेपरफुटी झाल्याचे सीबीएसईला माहिती असतानाही मंडळाने हा गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

दोन संचालकांचा समावेश

सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी शनिवारी खासगी शिकवणी वर्गाच्या दोन संचालकांसह चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. झारखंडच्या चात्रा जिल्ह्य़ातून शुक्रवारपासून इयत्ता १०वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसह १२ जणांना अटक केली. त्यात इयत्ता १० वीच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन विद्यार्थी पाटणामधील आहेत.

हिंदी विषयाचा पेपर बनावट

समाजमाध्यमांवर इयत्ता १२वीचा हिंदूी विषयाचा वितरित करण्यात येत असलेला पेपर बनावट असल्याचे सीबीएसईने शनिवारी स्पष्ट केले असून जनतेने याबाबत अफवा पसरवू नयेत, अशी विनंती केली आहे. सीबीएसईच्या वतीने हिंदी विषयाची परीक्षा २ एप्रिलला होणार आहे. समाजमाध्यमांवर १२ वीच्या हिंदी विषयाचा पेपर वितरित केला जात आहे तो बनावट असल्याचे सीबीएसईने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. हा पेपर गेल्या वर्षीचा असावा अथवा बनावट असावा, असेही मंडळाने म्हटले आहे.

‘एसएससी’ इच्छुकांची निदर्शने

कर्मचारी निवड आयोगाचे (एसएससी) पेपर फुटल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी इच्छुक शनिवारी रस्त्यावर उतरले असता त्यांची ल्युट्न्स दिल्ली येथे पोलिसांशी चकमक उडाली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या शेकडो इच्छुकांनी जंतरमंतर येथे निदर्शने केली आणि पेपरफुटी रोखण्यात सरकार असमर्थ ठरल्याचा आरोप केला. देशातील सुशिक्षित युवकांना नोकऱ्या देण्याची मागणीही करण्यात आली. निदर्शकांनी लेखी आश्वासनासाठी अधिकाऱ्यांना दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर निदर्शकांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या दिशेने कूच केले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.