माझे सर्व कुटुंब लष्करी सेवेत -लेफ्ट. जनरल निंभोरकर
शेतकरी कुटुंबातील मी असलो तरी सशस्त्र दलाचे महत्त्व आणि तेथील उच्च जीवनशैलीमुळे माझा एक भाऊ हवाईदलात आणि दुसरा नौदलात आहे. हवाईदलातील भाऊ निवृत्त होऊन व्यावसायिक वैमानिक आहे. पुढची पिढीही सशस्त्र दलात आली आहे. माझी मुलगी नौदलात वैद्यकीय अधिकारी असून जावईही नौदलातच आहे. बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड लाभल्यास असामान्य कर्तृत्व घडल्याशिवाय राहत नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लेफ्टनन्ट जनरल आर.आर. निंभोरकर आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचित.
वर्धा जिल्ह्य़ातील वडाळा या छोटय़ाशा गावातील गरीब शेतकऱ्याचा पुत्र देशाच्या सीमेवर मोलाचे कार्य करत असून ते देशातील सर्वात मोठय़ा जम्मू कोअरच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी सैन्यदलात घेतलेली भरारी विदर्भातील तरुणांना निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी बटालियन, ब्रिगेड आणि काऊंटर इन्सर्जन्सी फोर्सचे नेतृत्व केले. शिवाय, संयुक्त राष्ट्राची मोहीम आणि परदेशातील लष्करी शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त केले. त्यांना वीरता, निष्ठा, नेतृत्व करण्याच्या क्षमतेसाठी दोनदा सेनापदक, विशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदकाने सन्मानित करण्यात आले आहे. कारगील सेक्टरमधील एका ऑपरेशनदरम्यान बटालियनचे नेतृत्व करत असताना ते गंभीर जखमी झाले होते. त्यासाठी त्यांना पराक्रम पदक प्रदान करण्यात आले आहे.
शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. आईवडील शेतकाम करायचे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडा हुशार असल्याने मुख्याध्यापकाने शिष्यवृत्ती परीक्षेला बस. ही परीक्षा दिल्याने पैसै मिळतात, असे सांगितले. पैसे मिळातात म्हणून ही परीक्षा देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात सैनिक स्कूलच्या परीक्षेची माहिती झाली.
ही परीक्षा दिल्यास शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव होईल. तेव्हा सैनिक स्कूलची परीक्षा देण्याची सूचना मुख्याध्यापकाने केली. त्यामुळे ही परीक्षा दिली आणि त्यात मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यानंतर सातारा सैनिक स्कूलमध्ये तोंडी परीक्षेसाठी जायचे होते, परंतु वडाळा ते सातारा जायचे कसे?, यासाठी खर्च कसा करायचा, असा प्रश्न होता. कुटुंबीय त्याबाबत फार सकारात्मक नव्हते. यावेळी पुन्हा मुख्याध्यापकांनी हिंमत दिली आणि साताऱ्याला जाण्याचे ठरले. त्यावेळी अमरावती-पुणे अशी एस.टी. बस होती. वडाळ्याहून बडनेऱ्याला येणे सोईचे होते. त्यामुळे बडनेराला आलो आणि पुण्याला निघालो. तेथून पुढे साताऱ्याला पोहोचलो. लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षेतही उत्तीर्ण झालो. शैक्षणिक खर्च शाळा करणार असल्याचे कळल्यावर मुलाला ठेवण्यास बाबा तयार झाले. येथूनच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९६८ मध्ये सैनिकी शाळेत प्रवेश घेतला आणि १९७४ मध्ये तेथील शिक्षण पूर्ण करून खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून (एनडीए) शिक्षण घेतले. भारतीय लष्कर अकादमीतून ‘१५ पंजाब’मध्ये जून १९७९ ला दाखल झालो.
सैन्यदल हे देशसेवेबरोबरच रोजगाराची उत्तम संधी आहे. सैन्यदलात तुमची बुद्धीमत्ता आणि निर्णय क्षमता पणाला लागत असते. व्यक्तीचा सर्वागिण विकास यातून होतो आणि दर्जेदार जीवनाची हमीही मिळते. तुम्ही खेडय़ातील आहात की, शहरातील, तुम्हाला लष्करीसेवेची पाश्र्वभूमी आहेत की नाही, याचा काहीही संबंध सैन्यदलात दाखल होण्यात नाहीत. तुमची परिश्रम करण्याची तयारी असेल काहीही अशक्य नाही. भारताच्या युवा पिढीसमोर सशस्त्र दलात येण्याचे आव्हान आहे.
युवकांनी दृढनिश्चय केला, तर सैन्यातच नाही, तर जीवनातही यशस्वी होणे अशक्य नाही. शेतकरी कुटुंबातील असलो तरी सशस्त्र दलाचे महत्त्व आणि तेथील उच्च जीवनशैलीमुळे माझे दोन भाऊ लष्करात आले. एक भाऊ हवाईदल आणि दुसरा नौदलात सामील झाला.
हवाईदलातील भाऊ निवृत्त होऊन व्यावसायिक वैमानिक झाला आहे. पुढची पिढीही सशस्त्र दलात आली आहे. माझी मुलगी नौदलात वैद्यकीय अधिकारी असून जावईही नौदलातच आहे.

दोन वर्षांपासून जम्मूत शांतता
जम्मूमध्ये सीमा भागात लष्कर पहारा आहे. यामुळे सीमापार घुसखोरीला आळा बसला आहे. येथील लोकांना दहशतवाद नको आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागात कमालीची शांतता आहे. लष्कराच्या माध्यमातून येथे शाळा सुरू करण्यात आल्या असून दहशतवाद्यांचे बळी ठरलेल्यांच्या पाल्यांना शिक्षण दिले जात आहे. अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असून त्यांना रस्ते बांधून दिले जात आहेत. येथील लोकांना विकास हवा असून त्यांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. सीमावर्ती भागातील युवकांना रोजगार प्रशिक्षण दिले जात आहे, असे ते म्हणाले.