चांगल्या कल्पनांची प्रभावी अंमलबजावणी हवी
संसदेचे कामकाज सध्या सुरळीत चालू आहे पण त्याचे श्रेय मला नाही तर सर्व पक्षांना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या एका परिषदेत बोलताना सांगितले.
त्यांना बोलण्यासाठी ४५ मिनिटे दिली होती त्यावर ते विनोदाने म्हणाले, की मला संसदेत जायचे आहे, चांगली बातमी म्हणजे संसदेचे कामकाज सुरळीत चालले आहे पण त्याचे श्रेय सर्व पक्षांना आहे.
सरकारच्या कामगिरीबाबत त्यांनी सांगितले, की पूर्वेकडील राज्यात विकासाची प्रक्रिया सुरू केली आहे. बिहारमध्ये रेल्वे इंजिनांचे दोन प्रकल्प मंजूर केले आहेत, तेही बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर.
देशात चांगल्या कल्पनांची वानवा नाही पण त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. आम्ही १०० शहरांत एलइडी दिवे अनुदानित दराने उपलब्ध करून दिले आहेत व सार्वजनिक उद्योगातील कार्यसंस्कृती बदलली आहे. विकास करायचा पण पैसाही वाचवायचा अशी आमची भूमिका आहे असे सांगून ते म्हणाले, की आम्ही सार्वजनिक क्षेत्रात निर्गुतवणूक केली व अनुदाने कमी केली, त्याचे स्वागत झाले. मी अनुदान कमी केले तर सुधारणावादी म्हणून स्वागत होते पण अनुदानांची उद्दिष्टे पूर्ण केली तर त्या सुधारणा आहेत असे कुणाला वाटत नाही. लोकांना केलेल्या आवाहनानुसार ४० लाख लोकांनी गॅस सिलिंडरचे अनुदान सोडून दिले, त्यातून आता गरीब कुटुंबांना गॅस मिळेल. एलइडी दिव्यांसाठी १०० शहरांशी केंद्राने समझोता करार केला व त्यामुळे २१,५०० मेगावॉट वीज वाचली आहे. जर मी २१,५०० मेगावॉटचा वीज प्रकल्प जाहीर केला असता, तर प्रसारमाध्यमांनी त्याचे मथळे केले असते पण त्या प्रकल्पाला १.२५ लाख कोटी खर्च आला असता पण तोच परिणाम आपण एलइडी दिव्यातून साध्य केला पण कुणी लक्ष दिले नाही. आमच्या सरकारने वीजनिर्मितीचा विक्रम मोडला आहे, ८५ प्रकल्पांपैकी ६०-६५ सुरू केले आहेत, जे अनेक वर्षे बंद होते. आम्ही जहाज कंपन्या तोटय़ात होत्या त्या नफ्यात आणल्या. लोक निर्गुतवणूक करा म्हणतात केली तर छान केले म्हणतात पण नंतर संप झाले तर मोदी मुर्दाबाद.. अशा घोषणा देणाऱ्या निदर्शनांची छायाचित्रे पहिल्या पानावर छापतात. आपल्याकडे लोकांना निर्गुंतवणूक व प्रकल्प बंद करणे हे दोनच मार्ग माहिती आहेत त्यात तिसरा मार्ग कंपनीकरणाचा आहे. कार्यसंस्कृती बदलण्याचा आहे. महाराष्ट्रातील दाभोळ प्रकल्प दोन वर्षे बंद होता तो आता सुरू केला आहे. बंद पडलेले, ज्यांची कोनशिला सापडत नाही असे ६०-६५ प्रकल्प आम्ही सुरू केल्याचा दावा केला.