भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कार्डिअ‍ॅक  अरेस्टमुळे निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच, सर्व देशभरातून शोक व्यक्त करण्यात येतो आहे. भाजपच्या सर्व नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या भाषणांच्या जोरावर सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात संसदेमध्ये सर्वांची मनं जिंकून घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सुषमा स्वराज यांनी अतिशय कणखरपणे मांडली. अनेकदा सुषमा स्वराज यांच्यावर आरोपही झाले, मात्र प्रत्येकवेळी स्वराज यांनी संयम न सोडता प्रत्येक आरोपांना योग्य आणि समर्पक उत्तर दिलं होतं. स्वराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही नेटीझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.