पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे देश हळहळला, आता पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी होते आहे. अशात केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात एकजूट करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक शनिवारी सकाळी 11 वाजता संसदेच्या लायब्ररी हॉलमध्ये पार पडणार आहे. सरकारकडून पुलवामा हल्ल्यासंदर्भातल्या सगळे तपशील सर्वपक्षीय नेत्यांना सांगितले जातील आणि त्यानंतर काय करायचे याची रणनीती आखली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक घेण्यासंबंधीचा निर्णय झाला. त्यानुसार ही बैठक शनिवारी पार पडणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी सगळ्या पक्षांना विश्वासात घेतील अशी शक्यता आहे. एवढंच नाही तर सत्ताधारी आणि विरोधक असा कोणताही भेद आम्ही देशावर संकट आलेले असताना मानत नाही हा संदेशही जगापुढे मांडण्याची संधी मोदी सरकारपुढे आहे. एकदा विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं की कोणतंही पाऊल उचलणं सोपं असेल असं केंद्र सरकारचं मत आहे. दरम्यान शिवसेनेने या सगळ्या मुद्द्यावरून एक संयुक्त अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली आहे. अशात आता सर्वपक्षीय बैठकीत काय घडतं त्यावर पुढील गोष्टींची दिशा ठरणार आहे.

दरम्यान पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी केंद्राच्याही हालचाली सुरू असल्याचे दिसून येते आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.