जन्मापासून अवहेलना सहन करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून संविधान निर्मितीवेळी कोणताही कटुतापूर्ण दृष्टिकोन त्यामध्ये उमटला नाही. त्यांच्यामुळे आपले संविधान केवळ कायदेशीर दस्तावेज न राहता सामाजिक दस्तावेजही झाले आहे, असे गौरवौदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये काढले. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून संविधान दिनानिमित्त गेले दोन दिवस लोकसभेमध्ये सर्वपक्षीय चर्चा घडवून आणण्यात आली. या चर्चेचा शेवट नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाला.
मोदी म्हणाले, आपल्या संविधानाचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. त्यामधील बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतुल्य आहे. आयुष्यभर अवहेलना सहन करूनही जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली. तेव्हा त्यामध्ये कोणतीही कटुता त्यांनी उमटू दिली नाही. त्यांच्या योगदानामुळेच आपले संविधान सामाजिक दस्तावेजही बनले आहे. परेदशी अभ्यासकांनीही हा सामाजिक दस्तावेज असल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे आयुष्भर विषप्राशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने अमृत आपल्यासाठी मागे सोडले आहे.
आज एखाद्या विधेयकावर कितीही चर्चा आणि सुधारणा करून ते मंजूर केल्यावरही पुन्हा त्यात आवश्यक असलेले छोटे-मोठे बदल करण्यासाठी सरकारला संसदेकडे यावे लागते. मात्र, संविधान समितीने त्यावेळी केलेले संविधान आजही देशासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून मोदी म्हणाले, पक्षीय मतभेदांमुळे आज आपण संविधानातील चित्रेही एकमताने स्वीकारू शकणार नाही. मात्र, त्यावेळी संविधान समितीतील सदस्यांच्या दूरदृष्टीने या सर्वांवर समितीचे एकमत झाले होते.
देशातील सर्वच पंतप्रधानांच्या आणि सरकारच्या कामामुळेच देश पुढे गेला आहे. ही वास्तविकता कधी नाकारता येणार नाही. मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही याचा उल्लेख केला होता. केवळ अपेक्षेपेक्षा कमी काम केले तरच लोक तक्रार करतात. मात्र, देशातील जुन्या सरकारांनी काम केलेच नाही, असे आपण म्हणूच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या पक्षाकडे सभागृहात बहुमत असले, तरी सहमती आणि समजुतीने पुढे जाण्यावरच आमचा भर राहील. त्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.