संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा दिलासा
पाकिस्तानने अटक केलेले रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंगचे कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना सर्वतोपरी मदत करावी असे मी परराष्ट्र मंत्रालयास सांगितले असून त्यांना निश्चितच सरकार मदत करील, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे सांगितले. कुलभूषण जाधव यांच्याशी सरकारचा काही संबंध नाही असे भारताने याआधी स्पष्ट केले असून ते नौदलाचे माजी अधिकारी असल्याचे म्हटले होते. नंतर जाधव हे एक उद्योजक असून ते जहाजाने मालवाहतुकीचा व्यवसाय करीत होते व त्यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेले असे भारताने सांगितले.
जाधव हे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय नागरिक आहेत व त्यांच्या मदतीसाठी दूतावासामार्फत संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. जाधव हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांची काळजी वाटते असे पर्रिकर यांनी संरक्षण प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे आले असता स्पष्ट केले.
कुलभूषण जाधव हे माजी अधिकारी असून त्यांना मदत करण्यास आपण परराष्ट्र मंत्रालयास सांगितले आहे व त्यांना भारत सरकार सर्वती मदत करील असे सांगून पर्रिकर म्हणाले की, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या प्रकरणात चांगली भूमिका पार पाडली आहे.