करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान उत्तर प्रदेशातील मशिदींमध्ये अजान देण्यास अलाबाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. मात्र अजान देताना लाऊडस्पीकर किंवा इतर यंत्राचा वापर केला जाऊ शकत नाही असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

न्यायाधीश शशिकांत गुप्ता आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला दिलासा देताना सांगितलं आहे की, “अजान हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग असू शकतो पण लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा धर्माचा अविभाज्य भाग असू शकत नाही”. न्यायालयात करण्यात आलेल्या काही याचिकांवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने हा निर्णय दिला. याचिका करणाऱ्यांमध्ये केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद, लोकसभा खासदार अफजल अन्सारी यांचाही समावेश होता.

“मशिदीचा सांभाळ करणारी व्यक्ती कोणत्याही यंत्राचा वापर करताही अजान देऊ शकते असं आमचं मत आहे. यासोबत प्रशासनाने करोनाचा फैलाव रोखण्याच्या बहाण्याने यामध्ये कोणतीही अडचण निर्माण करु नये असा आदेश दिला जात आहे. जोपर्यंत नियमांचं उल्लंघन केलं जात नाही तोपर्यंत प्रशासन यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु शकत नाही,” असं खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

अफजल अन्सारी यांनी न्यायालयात याचिका करत गाजीपूरमधील लोकांच्या धार्मिक अधिकारांचा रक्षण केलं जावं तसंच राज्य सरकारला मशिदींचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीकडून अजान करण्याची परवानगी दिली जावी अशी याचिका केली होती. न्यायालयाने अजान करण्यास परवानगी दिली आहे, मात्र त्यावेळी लाऊ़डस्पीकर किंवा इतर यंत्राचा वापर होता कामा नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.