उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विद्यापीठातील इतिहास विभागाच्या तळघरात एक मुघलकालीन बंदूक आणि तोफगोळे सापडले आहेत. दरम्यान, सापडलेली मुघलकालीन बंदूक आणि तोफगोळे इतिहास विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. हे तोफगोळे 15 व्या ते 16 व्या शतकादरम्यानचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सापडलेल्या बंदुकीची लांबी ही अधिक असून मुघल काळात अशा बंदुका खांद्यावर ठेवून चालवल्या जात असल्याचे म्हटले जाते. या बंदुकीची अधिक माहिती मिळवण्यासाठी इतिहास विभाग यावर संशोधन करणार आहे.

आम्ही संरक्षण तज्ज्ञांना मिळालेली बंदूक दाखलवली. त्याच्या बनावटीनुसार ती बंदूक 15 व्या किंवा 16 शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात आली, अशी माहिती विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर तिवारी यांनी दिली. दरम्यान, मुघलकालीन बंदुकांची लांबी ही तुलनेने अधिक असून त्या वजनानेही जड असतात.

“विभागात कार्यरत असेलेले शिपाई सैयद अली यांना याबाबत माहिती होती आणि ते याबाबत चर्चादेखील करत होते. परंतु त्यांनी दिलेली माहिती कोणी गंभीररित्या घेतली नाही. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर अली यांनी माझ्याकडे येऊन या बंदुकांविषयी सांगितलं. त्यावेळी त्या मी आणण्यास सांगितल्या. तसंच भवनाच्या दुरूस्तीदरम्यान त्या तळघरातून काढण्यात आल्या आणि सुरक्षित स्थळी ठेवण्यात आल्या होत्या,” तिवारी म्हणाले. या बंदुकीचं वजन तब्बल 40 किलो आहे. तर प्रत्येक तोफगोळ्याचं वजन 20 किलो असल्याचं ते म्हणाले.