ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला असून, राज्यात या वेळी खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद करताना तृणमूल काँग्रेसच्या राजवटीवर चौफेर टीका केली.

येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डाव्या आघाडीची राजवट संपवून बंगालच्या जनतेने मोठय़ा विश्वासाने ममतांच्या हाती सत्ता सोपविली, मात्र दीदींनी केवळ आपल्या भाच्याचेच हित पाहिले असा टोला पंतप्रधानांनी लगावला. त्यांचा रोख ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे होता. यंदा राज्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार असून, शांतता, विकास उत्तम शिक्षण व रोजगार हे यामध्ये अपेक्षित आहे. बंगालमध्ये सत्तेत आल्यावर आदर्श राज्य निर्माण करू अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

देशातील जनताच मित्र

पंतप्रधान हे काही ठरावीक उद्योगपती मित्रांना मदत करतात या विरोधकांच्या आरोपालाही या सभेतून त्यांनी उत्तर दिले. १३० कोटी भारतीय हे माझे मित्र आहेत. त्यांच्यासाठी मी कार्यरत आहे. बंगालमधील या मित्रांसाठी ९० लाख गॅस जोडण्या दिल्या. चहा आणि बंगालमधील चहा मळ्यांमधील कर्मचाऱ्यांविषयी मला विशेष जिव्हाळा आहे. याच मित्रांसाठी विशेष सामाजिक सुरक्षा योजना आणल्याचे सांगताना राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिले.

तृणमूल काँग्रेसने लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली. त्यामुळे ममतांनी कितीही आरोप केले तरी राज्यात कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचाराचे ऑलिम्पिक भरवा!

तृणमूलच्या ‘खेल होबे’ या  घोषणेची खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. तृणमूल काँग्रेसचे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी अनेक घोटाळे केले असून भ्रष्टाचाराचे ऑलिम्पिक आयोजित करता येईल अशी टीका त्यांनी केली. तुमचा खेळ संपला असून विकासाचे पर्व सुरू होईल असे त्यांनी नमूद केले.

मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिगेड परेड मैदानावर घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा भाजप प्रवेश मात्र टळला आहे. गांगुली यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेतही होते पण अलिकडेच त्यांना दोनदा हृदयाचा त्रास झाला, त्यामुळे तूर्त तरी त्यांचे नाव मागे पडले आहे.

समर्थक  जोरदार प्रतिसाद देत असताना मिथुन यांनी त्यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवला. आमी जोलधारो नोई, बेले बोराओ नोई, अमी एकता कोब्रा एक चोबोल एइ चोबी. (घातक नसलेला साप मला समजू नका, मी कोब्रा आहे. कुणालाही एका डंखात मारू शकतो.)