News Flash

‘ट्रम्प यांच्यावरील आरोप राजकीय सूडबुद्धीने’

ट्रम्प यांच्या वकिलांचा युक्तिवाद

 

सत्तांतर प्रक्रियेच्या वेळी कॅपिटॉल हिल येथे आपल्या समर्थकांना त्यावेळी अध्यक्षपदावर असलेल्या  डोनाल्ड ट्रम्प यांनी  हिंसाचारास चिथावणी दिल्याचा आरोप धादांत खोटा आहे, केवळ राजकीय सूडबुद्धीतून हा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला असून त्यात काही तथ्य नाही, असा युक्तिवाद माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी सेनेटमध्ये महाभियोग सुनावणीच्यावेळी केला.

ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे असून त्यांनी युएस कॅपिटॉल हिल येथे ६ जानेवारी रोजी हिंसाचारास उत्तेजन दिले होते. यासाठी त्यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी सध्या सेनेटमध्ये सुरू असून डेमोक्रॅटिक पक्षानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ट्रम्प यांची बाजू त्यांचे वकील मांडत आहेत. ट्रम्प यांचे वकील ब्रुस कॅस्टर, डेव्हीड शोएन व मायकेल व्हॅनदर व्हीन यांनी सेनेटसमोर शुक्रवारी सांगितले, की ट्रम्प यांनी नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण केले आहे. त्यामुळे त्यांनी हिंसाचाराला चिथावणी देण्याचा आरोप खोटा आहे. महाभियोगाच्या सुनावणीचा शुक्रवारी चौथा दिवस होता. ट्रम्प यांच्या वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सोळा तास दिले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या विरोधात आधीच सोळा तास बाजू मांडली आहे. बायडेन हे निवडून आल्यानंतर त्यांनी सत्ता  हातात घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणला होता तसेच निवडणुकीचा निकालही मान्य केला नव्हता. ट्रम्प यांच्या वकिलांनी सांगितले,की महाभियोगासाठी कुठलेही सबळ पुरावे डेमोक्रॅटिक पक्षाला देता आलेले नाहीत. गेले दोन दिवस महाभियोगाच्या ज्या आरोपांवर चर्चा चालू आहे ती राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांचा हेतू राजकीय प्रतिस्पध्र्याना गारद करण्याचा आहे. कॅस्टर यांनी सांगितले, की तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी हिंसाचाराला उत्तेजन दिल्याचा आरोप हा खोटा आहे. त्यांनी कुणालाही चिथावणी दिली नव्हती. त्यामुळे ट्रम्प यांनी बंड किंवा विद्रोह केला असे म्हणता येणार नाही. त्यांच्यावर असा आरोप करणे खोटारडेपणाचे आहे. पहिल्या दोन संदेशात ट्विटरवर ट्रम्प यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा नेहमीच आदर केला असून त्यांच्यावर विद्रोहाचा आरोप करणे चुकीचे आहे. ज्या कलमान्वये महाभियोग दाखल करण्यात आला आहे ते अन्याय्य व घटनाबाह्य़ आहे, असे ट्रम्प यांचे वकील व्हॅनडर व्हीन यांनी सांगितले. दुसऱ्या कुठल्याही राजकीय सूडाच्या कृतीसारखीच कृती म्हणजे हा महाभियोग आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:34 am

Web Title: allegations against trump are politically motivated abn 97
Next Stories
1 देशात दिवसभरात १२,१४३ जणांना करोनाची लागण
2 मी न्यायालयात जाणार नाही; तेथे न्याय मिळत नाही
3 जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा : शहा 
Just Now!
X