मीटू प्रकरणात पत्रकार प्रिया रामाणी यांच्यासह किमान वीस महिलांनी  लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केलेले माजी मंत्री एम. जे. अकबर यांनी बुधवारी दिल्ली न्यायालयात त्यांची बाजू मांडताना रामाणी यांनी केलेले आरोप हे आपली हानी करणारे, कपोलकल्पित, चुकीचे व शिवराळ स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रामाणी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर त्यांनी बुधवारी त्यांची बाजू मांडली.

अकबर यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर निवेदन करताना सांगितले की, रामाणी यांनी १५ ऑक्टोबरला माझ्या विरोधात केलेले आरोप खोटे व निराधार आहेत. प्रिया रामाणी यांनी अकबर यांच्यावर वीस वर्षांपूर्वी त्यांच्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

अकबर यांनी सांगितले की, ‘रामाणी यांच्या आरोपांमुळे माझे तत्काळ मोठे नुकसान झाले आहे. व्यक्तिगत पातळीवर माझ्यावर आरोप करण्यात आले ते खोटे, कपोलकल्पित होते व दोन दशकांपूर्वी घडलेल्या  घटनांवर आधारित हे आरोप असले तरी तशा घटना घडलेल्या नाहीत त्या बनवून सांगण्यात आल्या. व्यक्तिगत पातळीवर मी या प्रकरणात न्याय मिळवण्याचे ठरवले असून मंत्रिपदावर त्याचा अन्योन्यप्रभाव टाळण्यासाठी पदाचा राजीनामा दिला. माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यात आली. सार्वजनिक पातळीवर लोकांच्या नजरेतून ती खराब केली गेली. माझ्या आप्तेष्टांमध्येही प्रतिमाहनन झाले. ’

अकबर यांनी रामाणी व इतर वीस महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपातून परराष्ट्र राज्यमंत्रिपदाचा १७ ऑक्टोबरला राजीनामा दिला होता. न्यायालयाने आता या प्रकरणी पुढील सुनावणीकरिता १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी अकबर यांनी दिलेल्या साक्षीदारांची निवेदने घेतली जातील. अकबर यांचे नाव ते नायजेरियात असताना मी टू चळवळीत पुढे आले. वीस महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. प्रिया रामाणी यांनी अब्रुनुक सानीच्या खटल्यास सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला असून अनेक महिलांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्याऐवजी अकबर यांनी त्यांना धमकावून गप्प करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप त्यांनी  केला आहे.