वाढती लोकसंख्या हा पाकिस्तानपुढचा बिकट होत चाललेला प्रश्न आहे. मात्र ९६ मुले असलेल्या पाकिस्तानच्या तीन नागरिकांना असे अजिबात वाटत नाही. हे तिघेही असे म्हणत आहेत की, जर आमच्या मुलांच्या गरजा ‘अल्लाह’ पूर्ण करेल असे अजब वक्तव्य या तिघांनाही केले आहे. १९ वर्षांनी पाकिस्तानमध्ये जनगणना झालीये ज्याचा अहवाल जुलै महिन्यात येऊ शकतो. आता पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटीपर्यंत होईल असा अंदाज आहे. याआधी १९९८ मध्ये पाकिस्तानमध्ये जनगणना झाली होती. त्यावेळी लोकसंख्या १३ कोटीच्या पुढे होती.

वर्ल्ड बँक आणि सरकारी आकडेवारीनुसार दक्षिण एशियातला पाकिस्तान हा असा देश आहे जिथे जन्मदर सगळ्यात जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तानला आर्थिक तूट सहन करावी लागते आहे असेही मत वर्ल्ड बँकेने नोंदवले आहे. पाकिस्तानात वास्तव करणाऱ्या गुलजार खान यांना ३६ मुले आहेत. अल्लाहने जर सगळे जग तयार केले आहे तर या मुलांची काळजीही अल्लाहच घेईल असे त्यांनी म्हटले आहे. आम्हाला शक्तीशाली व्हायचं आहे असे गुलजार यांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इस्लाम कुटुंब नियोजनाच्या विरोधात आहे त्यामुळे आम्ही ते करत नाही असेही गुलजार सांगतात. गुलजार यांची तिसरी पत्नी गरोदर आहे. पाकिस्तानात बहुविवाह कायदेशीर आहेत, मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र गुलजार यांच्या विचारांशी इथले बहुतांश लोक सहमत आहेत.

गुलजार यांचा भाऊ मस्तान वजीर खान यांना २२ मुले आहेत. तसेच त्यांचीही तीन लग्ने झाली आहेत. आपल्याला जी नातवंडे आहेत त्यांची संख्या आपण मोजू शकत नाही असे वजीर यांनी म्हटले आहे. अल्लाहने वचन दिले आहे की ते आपल्याला जेवण देतील, तसेच इतर गरजाही भागवतील, मात्र लोकांचा विश्वास कमी झाला आहे असे वजीर सांगतात. बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये राहणारे जान मोहम्मद यांना ३८ मुले आहेत. १०० मुलांना जन्म देणे हे आपले लक्ष्य आहे असेही जान मोहम्मद यांनी एएफपीला मुलाखत देताना म्हटले आहे. मोहम्मद यांची तीन लग्ने झाली आहेत त्यांना चौथे लग्नही करायचे आहे. जेवढे जास्त मुस्लिम असतील तेवढे शत्रू त्यांना घाबरतील असे मोहम्मद यांचे मानणे आहे. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम निश्चितच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होतो आहे. मात्र अशी मानसिकता असणारे अनेक लोक पाकिस्तानात आहेत. ही मानसिकता पाकिस्तानच्या प्रगतीत खोडा घालते आहे, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.