राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वैज्ञानिक अंगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एकमेव व अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या (एनटीआरओ) अध्यक्षपदी आल्हाद गोविंद आपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या या संस्थेचे अध्यक्षपद पी. व्ही. कुमार यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झाले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर या पदावर माजी दूरसंचार सचिव आर. चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे याच संस्थेत ज्येष्ठ सल्लागार म्हणून दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर कार्यरत असलेले आपटे यांची सरकारने नियुक्ती केली. सांगली जिल्ह्य़ातील तासगाव येथे जन्मलेले आल्हाद आपटे यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात संगणक प्रमुख आणि अणुखात्याच्या सायबर सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून ते ४० वर्षे कार्यरत होते. गेल्यावर्षी ते एनटीआरओमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून रुजू झाले. वैज्ञानिक कार्याशिवाय आपटे यांना संगीत आणि साहित्यासह अनेक विषयांमध्ये रुची आहे.