सोमवारी संध्याकाळी गुरुग्राममध्ये संयुक्त हिंदू संघर्ष समितिच्या बॅनरखाली काही संघटनांनी निदर्शनं केली. मुस्लिम समाजातील लोकं नमाज पठण करत असताना त्यांना रोखल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी निदर्शनं केली. तसंच शहरात मोकळ्या जागेत नमाज पठण करण्यावर बंदी घालावी अशीही मागणी या संघटनेनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 53 परिसरात 20 ऑक्टोबर रोजी एका मोकळ्या जागेत काही लोक नमाज पठण करत होते. त्यावेळी 6 जणांनी गोंधळ घातला आणि नमाज पठण करणा-यांना तेथून जाण्यास सांगितलं. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. मोकळ्या जागेतील नमाज पढण्यावर बंदी आणण्यासाठी शुक्रवारी रस्त्यावर उतरु असा इशाराही या संघटनांकडून देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास जवळपास 50 आंदोलनकारी शहरातील कमला नेहरु पार्कात जमा झाले. येथून त्यांनी मिनी सचिवालयापर्यंत मोर्चा काढला. सेक्टर 53 परिसरात पढली जाणारी नमाज म्हणजे बेकायदेशीररित्या जमिन बळकावण्याची सुरूवात आहे. नमाज पढणा-यांनी त्याठिकाणी भारताविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनात नारेबाजी केली असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. आरोपांचं एक पत्र निदर्शनकर्त्यांनी पोलीस उपायुक्त विनय प्रताप सिंह यांना सोपवलं आहे. गुरूग्राममध्ये राहणा-या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ओळख पटवा. त्यांना हिंदू वसाहतींजवळ नमाज पठण करण्यास परवानगी देऊ नये. ज्या ठिकाणी हा समाज 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे केवळ तेथेच नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रात , गेल्या दीड वर्षापासून गुरुग्रामच्या वजीराबाद येथील एका जमिनीच्या तुकड्यावर काही लोक नमाज पठण करत आहेत. जमिनिवर बेकायदेशीररित्या कब्जा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदुस्थान मुर्दाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या ना-यांमुळे परिस्थिती खराब होत आहे. काही देशभक्त तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली आणि युवकांना अटक केली, असं म्हटलं आहे.

दुसरीकडे, आम्ही नमाज पठण करताना एकमेकांसोबत बोलतही नाही, त्यामुळे नारेबाजी करण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व आरोप चुकीचे आणि खोटे आहेत, असं नेहरु युवा संघटन वेलफेअर सोसायटी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख वाजिद खान म्हणाले.
या सर्व घडामोडीमुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हं आहेत.