सीरियात गेली पाच वर्षे नागरी युद्ध चालू असून त्यात १६१ वेळा रासायनिक अस्त्रांचे हल्ले करण्यात आले व २०१५ अखेरीस त्यात १४९१ लोक मरण पावले आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.गेल्या वर्षी असे ६९ हल्ले झाले, त्यांची संख्या वाढतच आहे. एकूण १४ हजार ५८१ जण यात जखमी झाले.
सीरियन अमेरिकन मेडिकल सोसायटीच्या अहवालानुसार सीरियात यापूर्वी अनेकदा रासायनिक हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या ना नफा संस्थेने म्हटले आहे की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून ही आकडेवारी काढली आहे. संस्थेचे १७०० कर्मचारी सीरियातील १०० वैद्यकीय केंद्रात काम करीत आहेत. या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे याचा शोध आंतरराष्ट्रीय समुदायाने घ्यावा, अशी मागणी संघटनेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाकडे केली आहे. या संस्थेने त्यांच्याकडची माहिती ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स या संस्थेला दिली आहे. सीरिया सरकारने अमेरिका व पाश्चिमात्य देशांवर रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप वारंवार केला आहे. सुरक्षा मंडळाने २०१३ मध्ये दमास्कस येथे रासायनिक हल्ल्यात शेकडो नागरिक ठार झाल्यानंतर रासायनिक अस्त्र थांबवण्याचे आदेश दिले होते.