कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी बुधवारी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अशोक यांनी बंगळुरूमधील दोन ते तीन हजार करोना रुग्ण बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. या दोन ते तीन हजार रुग्णांनी आपले मोबाईल बंद ठेवले असून काहींनी घर सोडून पलायन केलं आहे, असं अशोक यांनी सांगितलं आहे. शहरातील सरकारी यंत्रणेला आणि प्रशासनाला यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं अशोक यांनी म्हटलं आहे. देशाची आयटी सीटी असणाऱ्या बंगळुरूमध्ये असा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

“माझ्या मते दोन ते तीन हजार करोना बाधित लोकांनी त्यांचे मोबाईल बंद ठेऊन, घर सोडलं आहे. ते नक्की कुठे गेलेत आम्हाला ठाऊक नाही,” असं अशोक यांनी म्हटल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. करोनाची बाधा झालेल्या व्यक्तींनी स्वत:चे फोन सुरु ठेवावेत असं आवाहनही अशोक यांनी केलं आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत मोबाईल बंद ठेवल्यास करोना रुग्णांची माहिती मिळवता येणार नाही आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होईल अशी भीती अशोक यांनी व्यक्त केलीय. “असं वागल्याने करोना रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे. म्हणून या व्यक्तींना हात जोडून विनंती करतो की त्यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा,” असं आवाहनही अशोक यांनी केलं आहे.

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. कर्नाटकमध्येही करोनाचे ३१ हजार ८३० रुग्ण मंगळवारी आढळून आले असून १८० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीय. यामध्ये बंगळुरू शहरात सर्वाधिक म्हणजेच १७ हजार ५५० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यामध्ये मंगळवार रात्रीपासून १४ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही लॉकडाउन लावत असल्याचं मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावं, सरकारला सहकार्य करावं, घरात थांबवं आणि अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन येडियुरप्पा यांनी केलं आहे.