नवी दिल्ली : तब्बल ७७ दिवसांच्या खंडानंतर सीबीआय संचालक म्हणून परतलेले आलोक वर्मा यांनी या कालावधीत काही अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या असून पुन्हा पूर्वीच्याच जागी त्यांच्या फेरनियुक्त्या केल्या आहेत.

आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादंगांनंतर केंद्र सरकारने २३ ऑक्टोबरला या दोघांना पदावरून दूर केले होते. त्यांच्याजागी एम. नागेश्वर राव यांची हंगामी संचालक म्हणून नेमणूक केली होती. त्यांनीच या बहुतांश बदल्या केल्या होत्या.

अस्थाना यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप असून त्या आरोपांच्या चौकशीसाठी जे अधिकारी नियुक्त होते त्यांच्या बदल्या राव यांनी केल्या होत्या. २४ ऑक्टोबरला सूत्र स्वीकारताच राव यांनी संयुक्त संचालक ए. के. शर्मा, उप पोलीस अधीक्षक ए. के. बस्सी, पोलीस उपमहानिरीक्षक एम. के. सिन्हा यांच्या बदल्या केल्या होत्या. तीन जानेवारीलाही त्यांनी संयुक्त संचालक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या सर्व बदल्या वर्मा यांनी रद्द केल्या आहेत.

वर्मा हे सकाळी पावणे अकराच्या सुमारास कार्यायात आले. तेव्हा राव यांनीच त्यांचे स्वागत केले. वर्मा रात्री उशीरापर्यंत कार्यालयात होते.

विशेष म्हणजे वर्माप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार निवड समितीची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाल्याचे समजते. या बैठकीस सरन्यायाधीश गोगोई यांच्याऐवजी न्या. ए. के. सिक्री उपस्थित होते, असे समजते. या बैठकीला अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.

.