सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयचे संचालक आलोककुमार वर्मा यांची प्राथमिक चौकशी केंद्रीय सतर्कता आयोगाने पूर्ण केली आहे, त्याआधारे सोमवारी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असून या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

आलोककुमार वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करून दोन आठवडय़ांत अहवाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात आली. सीबीआयचे संचालक आलोककुमार वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादातून वर्मा यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख के.व्ही. चौधरी यांच्यासह तीन जणांची समिती नेमली होती. वर्मा यांनी अस्थाना यांनी केलेले आरोप मुद्देसूदपणे फेटाळले आहेत. वर्मा यांच्या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या.एस.ते कौल यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे. यात वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्रीय सतर्कता आयोग, केंद्र सरकार यांना २६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालायने नोटिसा दिला होत्या. त्यात वर्मा यांची प्राथमिक चौकशी दोन आठवडय़ांत पूर्ण करण्यास सांगितले होते. आयपीएस अधिकारी व सीबीआयचे हंगामी प्रमुख एम नागेश्वर राव यांना महत्त्वाचे निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती. २३ ऑक्टोबरपासून राव यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावाही सर्वोच्च न्यायालय सोमवारी घेणार आहे. त्यावर योग्य ते आदेश जारी केले जातील. राव यांनी २३ ऑक्टोबरपासून घेतलेल्या निर्णयांची यादी मागवण्यात आली आहे. ती सीलबंद पाकिटातून सादर केली जाईल. दरम्यान, अस्थाना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरून काढण्याची मागणी केली आहे. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनेही अस्थाना यांच्यासह इतर सीबीआय अधिकाऱ्यांविरोधात विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यात केंद्र सरकार, सीबीआय, सतर्कता आयोग, अस्थाना, वर्मा व राव यांना नोटिसा जारी करून १२ नोव्हेंबपर्यंत उत्तर देण्याचे आदेश जारी केले होते.