मेवातच्या नूह गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय पहलू खान मागील शुक्रवारी एक दुभती म्हैस खरेदी करण्यासाठी जयसिंगपूरवरून जयसिंहकडे जाण्यास निघाले होते. पहूल खान हे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी होते. रमजानच्या काळात दूध उत्पादन वाढवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, शनिवारी जेव्हा गाय विकणाऱ्या व्यक्तीने पहलू खानसमोरच १२ लिटर दूध काढून दाखवले. तेव्हा पहलूने म्हैस ऐवजी गाय खरेदी केली. परंतु, त्यांचा हाच निर्णय जीवघेणा ठरला. पहलू यांचा २४ वर्षीय मुलगा म्हणाला, आयुष्यातील त्यांचा हा सर्वात चुकीचा निर्णय होता. या निर्णयाने माझ्या वडिलांचा जीव घेतला. इर्शाद आणि त्याचा भाऊ आरिफ त्या वेळी वडील पहलू खानबरोबरच होते. ते जेव्हा अलवरमधील बहरोर परिसरातून जात होते. त्यावेळी काही गोरक्षकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी होऊन सोमवारी पहलू खान यांचा मृत्यू झाला.
आरिफ म्हणाला, माझे वडील राजस्थान पासिंगच्या एक पिकअप ट्रकमध्ये ते अजमत बरोबर होते. अजमत आमच्या गावातलाच आहे. ट्रकमध्ये दोन गाय आणि दोन बछडे होते. इर्शाद आणि मी दुसऱ्या गावातील एका ट्रकमध्ये होतो. या ट्रकमध्ये ३ गाय आणि ३ बछडे होते. गोरक्षकांनी आमचे वाहन थांबवले. त्यांना बाहेर काढले आणि बेल्ट व काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली. सुमारे २० ते ३० मिनिटांनी पोलीस तेथे आले. तोपर्यंत त्यांची शुद्ध हरपली होती.
परंतु, गोरक्षकांनी या सर्व गायींची तस्करी करण्यात येत होती, असा आरोप केला आहे. राजस्थान पोलिसांनी दामोदर सिंह नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून पहलू खान व इतरांविरोधात बेकायदारित्या जनावरांना कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. या लोकांकडे गाय खरेदी केल्याची कागदपत्रे किंवा पावत्या नसल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मात्र, इर्शादने आपल्याकडे गाय खरेदी केल्याची पावती असल्याचे म्हटले आहे. जयपूर नगरपालिका (पावती क्र. ८९९४२) दाखवत इर्शाद म्हणाला, एफआयआरमध्ये पावती नसल्याचा उल्लेख का करण्यात आला नाही, याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. मी ४५ हजार रूपयांना गाय खरेदी केली होती.
हल्ल्याप्रकरणी सहा आरोंपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यात हुकुमचंद, जगमल, ओमप्रकाश, सुधीर, राहुल सैनी आणि नवीन सैनी यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.