राजस्थानातील अलवर येथे पतीसमोरच सामुहिक बलात्कार झालेल्या दलित महिलेची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भेट घेतली. याप्रकरणी आरोपींवर कारवाईबाबत मुख्यमंत्री गहलोत यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण इथे राजकारणासाठी आलेलो नाही हा राजकीय मुद्दा नसून भावनिक मुद्दा आहे, असे राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले.


राहुल गांधी म्हणाले, मी पीडितेच्या कुटुंबियांना भेटलो असून त्यांनी आमच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, यातील आरोपींवर कारवाई करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री गहलोत यांच्याशीही चर्चा झाली आहे.

२६ एप्रिल २०१९ रोजी थानागाझी-अलवर बायपासवर ६ अज्ञातांनी पीडित महिला आणि तिच्या पतीला अडवले आणि निर्मनुष्य जागेत घेऊन गेले. त्या ठिकाणी या नराधमांनी संबंधीत दलित महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. त्यानंतर तब्बल आठवड्यानंतर याप्रकरणी २ मे २०१९ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतरही आरोपींनी या घटनेची व्हिडिओ क्लीप ४ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या ५ जणांसह व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही घटना समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवण्यात आला. अलवर, जयपूर, दौसा आणि जवळच्या भागात भाजपाचे राज्यसभा खासदार किरोरीलाल मीना यांनी निषेध आंदोलने केली. दौसा येथे या आंदोलनानने हिंसक रुपही धारण केले होते. यामध्ये सुमारे वीस लोक जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, बसपा प्रमुख मायावती यांच्यामध्ये वाक् युद्ध रंगले होते.