एकेकाळी मुलायमसिंह यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले खासदार अमरसिंह हे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. अमरसिंह हे दिल्ली ते लखनऊ ‘आझम खान एफआयआर यात्रा’ काढणार आहेत. येत्या १६ ऑक्टोबरपासून ही यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि आझम खान हे या यात्रेत अमरसिंह यांच्या निशाण्यावर असतील. अमरसिंह समाजवादी पक्षाचा गड असलेल्या फिरोजाबाद, मैनपुरी आणि कन्नौज भागातून ही यात्रा घेऊन जाणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या तीन ठिकाणांहून सपाला पाच जागांवर विजय मिळाल्या होत्या.

युवा वाहिनी या एका हिंदुत्ववादी संघटनेने अमरसिंह यांना पाठिंबा दिला आहे. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना अमरसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वारंवार आभार मानले. त्यांच्यामुळे आज आपण जिवंत असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

अमरसिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, जेव्हा आम्ही रामपूरला गेलो होतो. तेव्हा सुरक्षित परत येऊ असा विचारही केला नव्हता. आम्ही एका दृष्टाच्या घरी जाऊन त्याला आव्हान दिले होते. पण योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांनी आम्ही सुरक्षित येण्याची विशेष काळजी घेतली.

गेल्या एका वर्षांपासून अमरसिंह हे मोदी आणि भाजपाचे गुणगान गाताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी हे कधीही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. ना कधी पराभूत होतील, असे त्यांनी म्हटले होते. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले होते. हे योगीचे सरकार आहे, कोणा भोगीचे नाही, असे ते म्हणाले होते.