जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा Lashkar e Taiba ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल Pak Terrorist Ismail याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशात कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर गृह मंत्रालयाचे एक पथक श्रीनगरला रवाना झाले आहे.

अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी ‘एएनआय’ला दिली.

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृत्यू झाला आहे. भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत अशा भ्याड हल्यांपुढे आणि द्वेषमुलक कृत्यांपुढे कधीच झुकणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.