अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. अ‍ॅसिड हल्ला करुन जीवे मारुन टाकू असा मजकूर असणारं पत्र नवनीत राणा यांच्या दिल्लीच्या शासकीय निवासस्थानवर पाठवण्यात आलं आहे. नवनीत राणा यांनी हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर पाठवण्यात आल्याचं म्हटलं आहे, असं एपीबीने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील नॉर्स एव्हेन्यू पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या नवनीत राणा यांच्या घरी हे धमकीचं निनावी पत्र आलं आहे. यामध्ये चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली असून त्यांचे  नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र मराठीमधून असल्याचे सांगण्यात आलं आहे. पत्राच्या वरच्या भागामध्ये शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. मात्र पत्रावर कोणाचाही नाव किंवा पत्ता नाहीय.

या पत्रामधील भाषा ही धमकी देणारी असून यामध्ये पती रवी राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नवनीत राणा यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. आठ फेब्रवारी रोजी नवनीत राणा यांनी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात बोलताना जे भाषण दिलेलं त्याचा उल्लेख या पत्रात असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भाषणामध्ये नवीन राणा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

या पत्रामध्ये अनेक अपशब्द आणि शिव्यांचा वापर करण्यात आला असून भाषणामधील टीकेसंदर्भात आठ दिवसात माफी मागि्तली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या एफआयआरवर १३ फेब्रवारी अशी तारीख दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी हे पत्र पाठवल्याची आम्हाला शंका आहे, असंही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पत्राबरोबरच मला अश्लील भाषेमध्ये धमक्या देणारे फोनही केले जात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. कोणत्याही महिलेला अशाप्रकारे फोन करुन धमकावणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं नवीन राणा यांनी म्हटलं आहे, असं अमर उजालाच्या वृत्तात नमूद करण्यात आलंय.