पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावरुन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अमरिंदर सिंग यांनी आम्ही १९९९ पर्यंतची सर्व युद्ध जिंकली आहेत, आता तुमची वेळ आहे असं म्हटलं आहे. “आम्ही १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ मधील युद्ध जिंकली आहेत. आता चीनने केलेल्या घुसखोरीला उत्तर देण्याची तुमची वेळ आहे,” असं अमरिंदर सिंग बोलले आहेत.

“१९६० पासूनच चीनसोबत आपले वाद सुरु आहेत. गलवानमध्ये हे पहिल्यांदाच झालेलं नाही. भारत सरकार योग्य लष्करी मदत घेत आहे याची मला खात्री आहे. मला वाटतं अक्साई चीन आणि सियाचीमधील अंतर कमी करण्याच्या चीनच्या हेतूपासून आपण सावध राहायला हवं,” असंही ते म्हणाले आहेत.

अमरिंदर सिंग यांनी यावेळी केंद्र सरकारला पीएम केअर फंडसाठी चिनी कंपन्यांकडून मिळालेली मदत पुन्हा परत करालवी असं आवाहनही केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा सामना करण्याच्या हेतूने पीएम केअर फंडची स्थापना केली होती. अनेक चिनी कंपन्यांनी पीएम केअर फंडसाठी मदत दिल्याचं अमरिंदर सिंग यांचं म्हणणं आहे. “चीनविरोधात आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे,” असं स्पष्ट मत अमरिंदर सिंग यांनी मांडलं आहे.

“आपले जवान शहीद होत असताना आणि भारतीय जमिनीवर घुसखोरी होत असताना चिनी पैसा आपण घेणं परवडणारं आहे असं मला वाटत नाही,” असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. चीनकडून एक रुपया जरी आला असेल तर तो परत केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. “मला वाटतं चिनी कंपन्यांकडून आलेला सगळा पैसा त्यांना परत केला पाहिजे. आपण त्याशिवायही सहजरित्या परिस्थिती सांभाळू शकतो. भारताला आपली काळजी घेण्यासाठी त्यांच्या पैशांची गरज नाही. आम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकतो,” असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे.