काँग्रेस हाय कमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि दीर्घकाळ चाललेला वाद संपल्याचे मान्य केले आहे, पण तसे होताना दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वाद अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांकडून हे स्पष्ट झाले आहे की सिद्धू यांनी माफी मागितल्याशिवाय ते कोणतीही बैठक घेणार नाहीत.

अमरिंदरसिंग यांनी ठेवली आहे माफीची अट

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्यासमोर नवज्योतसिंग सिद्धू यांनी माफी मागण्यासाठी अट घातली होती. सिद्धू यांनी त्यांच्यावर केलेल्या अपमानकारक वक्तव्यांबद्दल जाहीरपणे माफी मागावी, असे त्यांनी म्हटले होते.

पहिल्यांदा माफी मगच भेट

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीण ठुकराल यांनी पंजाबमधील सध्या सुरू असलेल्या वादाबाबत सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही वेळ मागितलेली नाही. सिद्धू यांच्या वृत्तीत कोणताही बदल नाही. सिद्धू हे सोशल मीडियावर केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तो पर्यंत कोणतीही भेट होणार नाही.”

खासदार-आमदारांसह जेवणाचा कोणताही कार्यक्रम नाही

अमरिंदर सिंग यांनी २१ जुलै रोजी नवजोतसिंग सिद्धू वगळता सर्व काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांना त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी बोलावले आहे हे वृत्त ही रवीण ठुकराल यांनी फेटाळून लावले. रविन यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की २१ जुलै रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग सर्व आमदार आणि खासदारांना दुपारच्या जेवणासाठी बोलवत आहेत, पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा कोणत्याही दुपारच्या जेवणाची योजना आखली नाही किंवा निमंत्रण पाठवले नाही.”


काँग्रेस पक्ष सध्या फक्त तीन राज्यांमध्ये सत्तेत आहे, पण दिल्लीतील दरबारी राजकारणापायी राज्यातील नेतेमंडळींना आपापसात झुंजविण्याचे प्रयत्न एवढी बिकट परिस्थिती असूनही सुरूच आहेत. पंजाबमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या एके काळच्या लष्करी अधिकाऱ्याला युद्धभूमीतून माघार घेण्यासारखाच अपमान सहन करावा लागला. मुख्यमंत्री सिंग यांचा विरोध डावलून पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली आहे.