पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी झटकल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना कडक उत्तर दिले आहे. मसूद अजहरला अटक करणे तुम्हाला जमत नसेल तर ते काम आम्ही तुमच्यासाठी करु असे टि्वट कॅप्टन अमरिंदर यांनी केले आहे.

डीअर इम्रान खान जैश-ए-मोहोम्मदचा प्रमुख मसूद अजहर बहावलपूरमध्ये बसला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने त्याने कट रचला. तिथे जा आणि त्याला अटक करा आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यासाठी ते काम करु असे टि्वट अमरिंदर यांनी केले आहे. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले. त्याचे पुढे काय झाले ? असा सवालही कॅप्टन अमरिंदर यांनी विचारला आहे.

भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. भारतात सध्या निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा सुरु आहे हे मी समजू शकतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत हात झटकले.