अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याबाबत लेखक चेतन भगतने (Chetan Bhagat) ट्विट करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. ‘जुनैदचा मृत्यू झाला होता, त्यावेळी मुस्लिम असल्याने त्याची हत्या झाल्याचे माध्यमांमध्ये म्हटले जात होते. मग आता अमरनाथ यात्रेकरुंची हिंदू असल्याने हत्या झाल्याचे का म्हणत नाही’ असा सवाल चेतन भगतने विचारला आहे. चेतन भगतच्या या ट्विटवर अनेकांनी तोंडसुख घेतले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग येथे सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले. अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असून ट्विटरवरही या हल्ल्याचे पडसाद उमटले. लेखक चेतन भगतने या हल्ल्यावर केलेले ट्विट वादाचा विषय ठरला.

‘हरयाणामध्ये जुनैदची हत्या झाली त्यावेळी तो मुस्लिम असल्याने त्याची हत्या झाली असे म्हटले जात होते. आता अमरनाथ यात्रेकरुंवर हिंदू असल्याने हल्ला झाला असे का म्हणत नाही अशा आशयाचे ट्विट त्याने केले. या ट्विटवर चेतन भगतला एका युजरने शांततेचा संदेश द्यावा अशी विनंती केली. यावरही चेतन भगतने उत्तर दिले. मला यावर चर्चा करायला आवडेल. पण मी कोणावरही आरोप करत नाही. मी फक्त वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला असे त्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी हरयाणामध्ये गोमांस सेवन केल्याचा आरोप करीत टोळक्याने केलेल्या मारहाणीत जुनैद खानचा मृत्यू झाला होता. या घटनेचा देशभरातून निषेध झाला होता.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीदेखील चेतन भगतच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली. मृत्यू झालेले अमरनाथ यात्रेकरुन हिंदू होते असे आम्ही म्हणू. पण जातीय द्वेषातून होणाऱ्या हत्या कशा रोखता येतील यावरही तोडगा सांगावा असे सरदेसाई यांनी चेतन भगतला उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.