जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा संपूर्ण कट कसा आखला गेला, याची सविस्तर माहिती रविवारी पोलिसांकडून समोर ठेवण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पोलीस महानिरीक्षक एसपी पनी यांच्या नेतृत्वाखाली या हल्ल्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडून आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला.

या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनीही आपण हल्ल्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. या तिघांची ओळख पटली असून हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांनीच अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांच्या प्रवासाची, त्यांना वाहने पुरवण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली होती. हे सर्वजण लष्करच्या दहशतवाद्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करत होते. अबू इस्माइल या पथकाचे नेतृत्त्व करत होता. त्याने यापूर्वी ९ जुलैला अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी यात्रेकरूंच्या बसभोवती असलेल्या कडेकोट लष्करी बंदोबस्तामुळे हा प्रयत्न फसला होता. सुरूवातीला दहशतवाद्यांनी ९ जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, हल्ल्यासाठी निवडलेल्या निर्मनुष्य परिसरातून त्या दिवशी सीआरपीएफ किंवा अमरनाथ यात्रेकरूंचे एकही वाहन गेले नाही. त्यानंतर १० जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्यात आला. तेव्हा या ठिकाणी सीआरपीएफचे वाहन असते तर दहशतवाद्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला असता. त्यांनी तसा कटच आखला होता. दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बससाठी ‘शौकत’ आणि सीआरपीएफच्या वाहनासाठी ‘बिलाल’ हा सांकेतिक शब्द ठरवला होता, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एसपी पनी यांनी दिली.