जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे तेथील महबुबा मुफ्तींचं सरकार कोसळलं आहे. आज दुपारी अचानक भाजपाने महबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा केली आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे येथे राजकीय भूंकप तर आलाच आहे पण येथील परिस्थिती अस्थिर बनली आहे. त्यातच जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला 28 जूनपासून सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणे या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा धोका तर आहेच पण आता येथे सरकारचंच अस्तित्व नसल्याने यात्रेकरुंच्या सुरक्षेचं काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

3 हजार 880 मीटर उंचीवर स्थित असणा-या अमरनाथची यात्रा जवळपास महिन्याभरापेक्षा जास्त काळ सुरु राहते. अमरनाथच्‍या दर्शनासाठी जाणारे भाविक अनंतनाग जिल्‍ह्याच्‍या परंपरागत 28.2 किमी लांब पहलगाम मार्ग आणि गंदेरबल जिल्‍ह्याच्‍या 9.5 किमी लांब बालटाल मार्गावरुन जातात. पण दरवर्षीप्रमाणे यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामध्ये भर म्हणजे तेथील सध्याची राजकीय परिस्थिती. याशिवाय अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्यासाठी घाटीमध्ये 200 दहशतवादी दबा धरुन बसल्याचं वृत्त आलं होतं. त्यामुळे यात्रेचं आणि सुरक्षेचं नेमकं काय होणार याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची चाचपणी केली होती. गेल्या वर्षी भाविकांच्या सुरक्षेसाठी 35 हजार जवान तैनात करण्यात आले होते. तर यावर्षी 22 हजार अतिरिक्त जवानांची मागणी करण्यात आली आहे.