जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेत सोमवारी जी बस दहशतवाद्यांच्या गोळीबाराचे लक्ष्य ठरली त्या गाडीचा चालक असलेला गुजरातचा सलीम शेख याला उर्वरित प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाल्याबाबत तीन लाखांचे बक्षीस जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे.

सोमवारी रात्री साडेआठनंतर बसच्या एका बाजूवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा या चालकाने विचलित न होता बस तशीच पुढे नेली, भाविकांना सुरक्षित स्थळी नेऊनच बस थांबवायची असा निर्णय त्याने घेतला. देवानेच मला हे बळ दिले व मी थांबलो नाही, असे सलीम याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मंगळवारी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सलीमचे कौतुक केले असून त्याच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी करणार असल्याचे स्पष्ट केले. सलीमचा चुलतभाऊ जावेद मिर्झा हा गुजरातमधील बलसाडचा रहिवासी असून त्याने सांगितले की, सलीमने गोळीबार चालू असताना बस न थांबवता ती सुरक्षित ठिकाणी नेली. तो सात जणांचे प्राण वाचवू शकला नाही पण इतर ५० जणांचे प्राण वाचले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या बसमध्ये साठ प्रवासी होते. सलीम याने जावेदला या हल्ल्याची माहिती सोमवारी रात्री साडेनऊला दिली होती.