नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्यसेन यांची टीका

केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे दिशादर्शक यंत्रणा नसलेले आणि एकतर्फी क्षेपणास्त्र आहे, अशी टीका नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली.

मुंबईतील एका कार्यक्रमात ‘सर्वासाठी आरोग्यसुविधा’ या विषयावर सेन बोलत होते. भारतासारखा लोकशाही देश, चीनसारखा साम्यवादी देश यांच्या निर्णयप्रक्रियेत कसा फरक आहे हेही त्यांनी सांगितले. भारतासारख्या देशात बहुसंख्य जनतेची मागणी असल्यावर एखादा निर्णय होतो, तर चीनमध्ये राज्यकर्त्यांचा छोटा समूह निर्णय घेतो, असे ते म्हणाले. त्याच अनुषंगाने ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घाईघाईत आणि परिणामांचा फारसा विचार न करता घेतला गेला होता. हा निर्णय एखाद्या दिशाहीन क्षेपणास्त्रासारखा होता. ते भरकटत जाऊन कुठे पडले हे समजत नव्हते, असे ते म्हणाले.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनीही सरकारवर टीका केली. हैदराबाद साहित्य महोत्सवात ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशावर आघात करण्यासाठी आहे, असे सरकारचे म्हणणे होते. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी तो देशात रुपयांच्या स्वरूपात ठेवलेला नाही. तो परदेशातील बँकांमध्ये, कंपन्या आणि अन्य मालमत्तेत गुंतवला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठी भारतात प्रयत्न करणे म्हणजे डेंग्यूचा हा डास परदेशात असताना देशात काठी घेऊन फिरल्यासारखे आहे, असे शौरी म्हणाले.