तंत्रज्ञानामुळे आज अनेक कामं सोपी झाली असली तरी युजर्सची गोपनीयता आणि डेटाबाबत धोका वाढला आहे. हॅकर्स आता ‘हाय सिक्युरिटी टेक्नॉलॉजी’वरही अगदी सहज मात करतायेत. जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon चे मालक जेफ बेझॉस हे देखील यातून वाचू शकले नाहीत. एक WhatsApp मेसेज रिसिव्ह केल्यानंतर जेफ बेझॉस यांचा मोबाइल हॅक झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे ज्या नंबरवरुन जेफ यांना मेसेज आला तो सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांचा होता असं सांगितलं जात आहे.

The Guardian च्या एका वृत्तानुसार, दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1 मे 2018 रोजी हा प्रकार घडला होता. जेफ आणि सलमान यांच्यातील चर्चेदरम्यान एक व्हिडिओ सेंड करण्यात आला होता. हा व्हिडिओ म्हणजे जेफ यांच्या फोनमध्ये घुसखोरी करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आलेला व्हायरस(malicious file) असलेली फाइल होती. काही तासांमध्येच जेफ यांच्या मोबाइलमधून बराच डेटा चोरीला गेला. पण, नेमका कोणता डेटा चोरीला गेला याबाबत माहिती नसल्याचं The Guardian ने स्पष्ट केलं आहे.

मात्र, या वृत्तामुळे फोन हॅकिंगच्या घटनेनंतरच अमेरिकी टॅब्लॉइड the National Enquirer ने बेझोस यांच्या खासगी आयुष्यातील माहिती प्रकाशित कशी केली?, तसेच ‘वॉशिंगटन पोस्ट’चे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येबाबतही अनेक सवाल उपस्थित होत आहेत. फोन हॅकिंगच्या पाच महिन्यांनंतर ऑक्टोबर 2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या झाली होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अमेरिकेचे प्रसिद्ध वृत्तपत्र असून जेफ बेझॉस हेच याचे मालक आहेत. दुसरीकडे, सौदीचे परराष्ट्र मंत्री अदिल अल-जुबेर यांनी सर्व आरोप फेटाळताना या प्रकरणाशी सौदी अरेबियाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. याशिवाय the National Enquirer ने देखील जेफ यांचे आरोप फेटाळले असून रिपोर्टिंग करताना चुकीच्या मार्गाचा वापर केला नाही असं म्हटलंय.