अॅमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाकडून पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय, अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराविरुद्ध आवाज उठवला आहे. तसेच अॅमेझॉनने तातडीने ही उत्पादने संकेतस्थळावरून काढून टाकावीत, असेही बग्गा यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाईटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला होता. तसेच अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे भारतात अॅमेझॉनविरुद्ध वातावरण चांगलेच तापले होते. ‘अॅमेझॉनने तात्काळ या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी. अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील,’ अशी तंबीच सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली होती. याशिवाय, स्वराज यांनी कॅनडातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट अॅमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर अॅमेझॉन कॅनडाने आपल्या संकेतस्थळावरून संबंधित पेज हटवले होते. यापूर्वीही अॅमेझॉनकडून अशा प्रकारचा प्रमाद घडला होता. गेल्या वर्षी अॅमेझॉनने भारतीय देवी- देवतांची चित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती. यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता. त्यानंतर अॅमेझॉनने ‘सॉरी’ म्हणत सर्व उत्पादने संकेतस्थळावरून हटवली होती. पण मोदी सरकारने अॅमेझॉनविरोधात कठोर पवित्रा घेतला होता. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा मुद्दा अॅमेझॉनच्या तेथील वरिष्ठांसमोर अधिक जोरकसपणे मांडा, अशा सूचना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.