भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावर विक्रीस ठेवल्याने टिकेला सामोरे जावे लागलेल्या अॅमेझॉनने आता भारत सरकारकडे स्पष्टीकरण दिले आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिके आणि चिन्हांचा उत्पादनावरील वापर यावरुन अॅमेझॉनकडून भारत सरकारला स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘आम्ही आमच्या संकेतस्थळावरील उत्पादने तपासली आहेत. जगभरातील अॅमेझॉनच्या संकेतस्थळांवर भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होईल, असे उत्पादन असणार नाही. नियमांच्या विरोधात जाईल, अशी कोणतीही कृती अॅमेझॉनक़ून होणार नाही,’ असे स्पष्टीकरण अॅमेझॉनकडून देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी विक्रीस ठेवण्यात आल्याने मोठा वाद झाला होता. अॅमेझॉनच्या कॅनडातील संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आली होती. यासोबतच परदेशातील संकेतस्थळांवर भारतीय ध्वज आणि प्रतिकांचा वापर करण्यात आलेली अनेक उत्पादने अॅमेझॉनकडून विक्रीला ठेवण्यात आल्याचे समोर आले होते. अॅमेझॉनकडून महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या चपलांचीदेखील विक्री सुरू होती. मात्र या सगळ्याचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आल्यानंतर ही सर्व उत्पादने अॅमेझॉनने संकेतस्थळांवरुन हटवली. ई-कॉमर्स क्षेत्रात जगातील अव्वल क्रमांकावर असलेली अॅमेझॉन २६ देशांमध्ये सक्रीय आहे.

परदेशात भारतीय राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होत असल्याची बाब काही अनिवासी भारतीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर सुषमा स्वराज यांनी जानेवारीत अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना थेट विसा रद्द करण्याचा इशारा दिला. ‘अॅमेझॉनने त्यांच्या संकेतस्थळावरील वादग्रस्त उत्पादने न हटवल्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांना विसा देण्यात येणार नाही आणि आधी देण्यात आलेले सर्व विसा रद्द केले जातील,’ असा इशारा स्वराज यांनी दिल्यामुळे अॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली होती.

अॅमेझॉनने सॉफ्टवेअर यंत्रणेत काही बदल केले आहेत. यामुळे अॅमेझॉनवर वस्तूंची विक्री करताना एक अतिरिक्त पर्याय देण्यात आला आहे. यामुळे वस्तूंची विक्री करताना त्या वस्तूची अतिरिक्त माहिती विक्रेत्यांना द्यावी लागणार आहे. यासोबतच भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या उत्पादनांची तपासणीदेखील अॅमेझॉनकडून केली जाणार आहे. लवकरच अॅमेझॉनकडून भारतात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.