18 February 2020

News Flash

अ‍ॅमेझॉन इंडियाचे १०,००० इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष्य

भारतात अ‍ॅमेझॉनच्या ताफ्यात दाखल होणारी वाहने या संख्येमध्ये आणखी भर टाकणार आहेत.

 

वितरण व्यवस्थेतील ताफ्याकरिता २०२५ चे उद्दिष्ट

वितरण व्यवस्थेतील वाहनांच्या ताफ्यामध्ये २०२५ पर्यंत १०,००० इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) दाखल करणार असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉन इंडियामार्फत सोमवारी करण्यात आली. २०१९ मध्ये भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये या वाहनांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनीने ही कटिबद्धता जाहीर केली आहे.

वितरणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या प्रयोगामुळेच कंपनीला अशा गाडय़ांचा मोठा ताफा तयार करण्यासाठी दीर्घकाळ चालणाऱ्या आणि हे लक्ष्य प्रत्यक्षात उतरवू शकणाऱ्या अशी वाहने तयार करण्यास सहकार्य मिळाले आहे. अ‍ॅमेझॉनने स्वाक्षरी केलेल्या हवामान प्रतिज्ञेमध्ये घोषित केल्यानुसार २०३० पर्यंत कंपनीच्या जगभरातील वितरणयंत्रणेमध्ये १,००,००० इलेक्ट्रिकल वाहने दाखल करून घेण्याचे वचन कंपनीने दिले होते. भारतात अ‍ॅमेझॉनच्या ताफ्यात दाखल होणारी वाहने या संख्येमध्ये आणखी भर टाकणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे व वितरणाच्या कामामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याचे अ‍ॅमेझॉन इंडियाचे ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १०,००० वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. त्याचे आरेखन आणि उत्पादन भारतातच करण्यात आले असून २०२० मध्ये ही वाहने दिल्ली व परिसर तसेच बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, नागपूर, कोईंबतूर अशा २० हून अधिक शहरांमध्ये चालविण्यात येतील व या संख्येमध्ये भविष्यात भर पडेल, असे स्पष्ट करण्यात आले.

ग्राहकांना सातत्याने आणि सुरक्षितरित्या मागणी नोंदविलेली वस्तू घरपोच मिळण्याची हमी देणाऱ्या वाहनांचा ताफा तयार करण्यासाठी अ‍ॅमेझॉन इंडिया अनेक भारतीय उपकरण निर्मिती कंपन्यांबरोबर कार्यरत असून गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ई-मोबिलिटी उद्योगक्षेत्रामध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीमुळे अशा वाहनांच्या निर्मितीला प्रगत तंत्रज्ञान, अधिक उत्तम दर्जाच्या मोटर आणि बॅटरी घटकांची साथ मिळाली असल्याचे सांगितले. जून २०२० पर्यंत एकदा वापरावयाच्या प्लास्टिकचे उच्चाटन करण्याची घोषणा कंपनीने सप्टेंबर २०१९ मध्ये केली होती.

आमच्या कामकाजाचा पर्यावरणावर कमीत-कमी परिणाम होईल अशाप्रकारची पुरवठा साखळी तयार करण्याप्रती अ‍ॅमेझॉन इंडिया वचनबद्ध आहे. २०२५ पर्यंत आमच्या ताफ्यात दाखल होणारे १०,००० इलेक्ट्रिक वाहने म्हणजे ऊर्जास्नेही वर्तनाच्या बाबतीत या उद्योगक्षेत्राचे नेतृत्व करणारी कंपनी होण्याच्या दिशेने चाललेल्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनणारा एक मैलाचा टप्पा असणार आहे. आमच्या वितरण ताफ्याच्या विद्युतीकरणामध्ये आम्ही यापुढेही गुंतवणूक करत राहू व त्यायोगे अपुनर्नवीकरणीय ऊर्जेवरील अबलंबित्व कमी करू.

अ‍ॅमेझॉनचे अखिल सक्सेना.

First Published on January 21, 2020 1:14 am

Web Title: amazon india electric car target akp 94
Next Stories
1 रिलायन्स, टीसीएसकडून हिरमोड
2 दहा लाख रोजगार निर्माणाचे ‘अ‍ॅमेझॉन’चे लक्ष्य
3 दूरसंचार कंपन्यांना दणक्याचे भांडवली बाजारात पडसाद
Just Now!
X