अॅमेझॉन इंडिया येत्या सेलसाठी ७,५०० तात्पुरते रोजगार देणार आहे. अॅमेझॉनकडून हे रोजगार सामानाच्या डिलेव्हरीसाठी तयार केले जाणार आहेत. २० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत अॅमेझॉन इंडियाकडून ‘ग्रेट इंडियन सेल’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘आम्ही येत्या ग्रेट इंडियन सेलसाठी साडे सात हजार तात्पुरते रोजगार तयार करणार आहोत. आमच्या २७ मुख्य केंद्रांसह १०० डिलेव्हरी केंद्रांवर रोजगार उपलब्ध असणार आहेत,’ अशी माहिती अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. ‘अॅमेझॉन.इनकडून दरवर्षी हजारो तात्पुरते रोजगार पुरवले जातात. याशिवाय दिर्घकालीन रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करुन दिल्या जातात,’ असेही सक्सेना यांनी म्हटले आहे.

‘२० ते २२ जानेवारी या कालावधीत तयार होणाऱ्या रोजगारांसाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतून निवडण्यात आलेला लोकांना ग्रेट इंडियन सेलसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. या लोकांचे अॅमेझॉनमध्ये स्वागत आहे,’ असे अखिल सक्सेना यांनी सांगितले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात सध्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी अॅमेझॉनची फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिल या भारतीय कंपन्यांशी स्पर्धा आहे. भारतीय कंपन्यांना मागे टाकण्यासाठी सामानाच्या डिलेव्हरी करण्याच्या क्षमतेवर अॅमेझॉनने लक्ष केंद्रीत केले आहे. सामानाची डिलेव्हरी करण्याची क्षमता वाढावी, यासाठी अॅमेझॉनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात अॅमेझॉनने सहा नव्या फुलफिलमेंट सेंटरमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे देशभरातील कंपनीच्या फुलफिलमेंट सेंटरची संख्या २७ वर जाऊन पोहोचली आहे. ‘१० राज्यांमधील २७ फुलफिलमेंट सेंटरमुळे हजारो विक्रेत्यांना देशभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचला येईल. या फुलफिलमेंट सेंटरच्या माध्यमातून अॅमेझॉनवर ऑर्डर केलेले सामान वेगाने लोकांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती अखिल सक्सेना यांनी दिली आहे.