जगातील सर्वात मोठी ई-कंपनी असलेल्या अमॅझॉनचे मालक जेफ बेझॉस यांचा भ्रमणध्वनी हॅक झाल्याचे वृत्त आहे. एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश मिळाल्यानंतर बेझॉस यांचा भ्रमणध्वनी हॅक झाला आणि ज्या क्रमांकावरून बेझॉस यांना संदेश आला तो क्रमांक सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा होता, असे सांगण्यात येत आहे.

जवळपास दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मे २०१८ रोजी हा प्रकार घडला होता. जेफ आणि सलमान यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ पाठविण्यात आला होता. हा व्हिडीओ म्हणजे बेझॉस यांच्या भ्रमणध्वनीमध्ये घुसखोरी करण्यासाठी विशिष्ट रचना करण्यात आलेला विषाणू असलेली फाइल होती. काही तासांमध्येच बेझॉस यांच्या भ्रमणध्वनीमधून बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर माहिती चोरीला गेली, असे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे, मात्र नेमकी कोणती माहिती चोरीला गेली त्याची माहिती नसल्याचेही म्हटले आहे.

या वृत्तामुळे भ्रमणध्वनी हॅक केल्यानंतर ‘द नॅशनल एन्क्वायरर’ने बेझॉस यांच्या खासगी आयुष्यातील माहिती प्रकाशित कशी केली, वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या याबाबतही अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. भ्रमणध्वनी हॅक झाल्यानंतर पाच महिन्यांनी खाशोगी यांची हत्या झाली होती, बेझॉस हेच वॉशिंग्टन पोस्टचे मालक आहेत.

सौदीचे परराष्ट्रमंत्री आदिल अल-जुबेर यांनी सर्व आरोप फेटाळले आणि सौदीचा याच्यााशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘द नॅशनल एन्क्वायरर’नेही आरोप फेटाळले असून वार्ताकन करताना चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, असे म्हटले आहे.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्हॉट्स अ‍ॅप संदेशाद्वारे वॉशिंग्टन पोस्टचे मालक आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा मोबाइल हॅक केल्याच्या वृत्ताचा अमेरिकेतील सौदीच्या दूतावासाने इन्कार केला आहे.

जेफ बेझोस यांच्या मोबाइल हॅकिंगच्यामागे सौदी सरकारचा हात असल्याचा अहवाल काही प्रसिद्धी माध्यमांनी दिला असून त्या हास्यास्पद असल्याचे सौदी अरेबियाच्या दूतावासाने मंगळवारी ट्विटर म्हटले आहे.