‘तांडव’ या वेबसीरीजवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारींची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. त्यावरुन अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील अधिकाऱ्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाने समन्स बजावले आहे.

या प्रकरणी दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या यांमध्ये भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून तांडव या वेबसीरीजवर बंदी घालण्याची तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉर लावण्याची मागणीही केली.

जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात कोटक म्हणाले होते, “सध्या प्रामुख्याने तरुण वर्गामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म खूपच प्रसिद्ध झाला आहे. हा प्लॅटफॉर्म सध्या सेन्सॉरमुक्त असल्याने याचा बऱ्याचदा निर्माते गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे आता ओटीटीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे सेक्स, हिंसाचार, ड्रग्ज, शिवीगाळ, द्वेष आणि अश्लिलतेने भरललेल्या असतात. काहीवेळा त्यातून हिंदूंच्या आणि धार्मिक भावना दुखावल्या जातात.”

तत्पूर्वी, भाजपाचे आमदार राम कदम यांनी रविवारी दुपारी घाटकोपर पोलीस ठाण्यात तांडवच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली.