ई-व्यापाराच्या क्षेत्रात भारतात वेगाने पाय पसरवत असलेल्या अॅमेझॉनने देशामध्ये आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येथील एका कार्यक्रमामध्ये अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बिझॉस यांनी ही घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे भारतात रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत.
यापूर्वी २०१४ मध्ये अॅमेझॉनने भारतात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. आता आणखी ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा घोषणा करण्यात आली आहे. आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे भारतात ४५ हजार रोजगार निर्मिती झाली आहे. पुढील काळातही भारतीय अर्थव्यवस्था आणखी वेगाने वाढू शकते, असा विश्वास जेफ बिझॉस यांनी व्यक्त केला आहे. अॅमेझॉनने निर्धारित केलेले लक्ष्य अॅमेझॉन डॉट इनची टीम पूर्ण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बिझॉस यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, स्टार इंडियानेही पुढील तीन वर्षांत भारतात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे यावेळी जाहीर केले. स्टार इंडिया ही ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ या अमेरिकी कंपनीची उपकंपनी आहे.